पुणे : आपल्याला हवी असलेली बहुतांश माहिती काही सेकंदात आपण गुगलवर शोधू शकतो. गुगल मॅपचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी कोणत्याही गाइड्सची मदत न घेता पोहोचू शकतो. मात्र, गुगलचे जसे असंख्य फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत. गुगलवर विशिष्ट प्रकारची माहिती सर्च केल्यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊया.
काय सर्च करू नये ?
हॅकिंग संबंधित माहिती
एखाद्या व्यक्तीचा मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर वस्तू त्याची परवानगी नसताना हँक करणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे जर हॅकिंगसंदर्भात माहिती सर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.
शस्त्रासंबंधी माहिती
गुगलवर काही गोष्टी सातत्याने सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही काय सर्च करता, यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा असते. तुम्ही बंदूक, तलवार व इतर शस्त्रासंबंधीची माहिती सर्च केली? ती कुठे मिळतात, त्यांचा वापर कसा करायचा, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमची चौकशी केली जाऊ शकते.
चाइल्ड पॉर्नोग्राफी
देशात बाललैंगिक शोषणासंबंधीचे कायदे कडक आहेत. त्यामुळे तुम्ही जर गुगलवर या प्रकारचा मजकूर सर्च करत असाल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये देखील जावे लागू शकते. चाइल्ड पॉर्नोग्राफी कायद्याने गुन्हा आहे.