नवी दिल्ली : आशियाई विशेषतः दक्षिण कोरिया आणि जपानमधील तरुणी पाश्चात्त्य पुरुषांशी लग्न करणे अधिकाधिक पसंत करत आहेत. स्वतःच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक विचारसरणीला या तरुणी कंटाळल्या आहेत. पुरुषसत्ताक पारंपरिक विचारसरणी आणि असमान वेतनापासून सुटका करण्याची संधी म्हणून त्या लग्नाकडे पाहत आहेत.
दक्षिण कोरियाच्या संस्कृतीत एक प्राचीन नियम आहे. ज्यानुसार स्त्रियांनी लग्नाआधी वडिलांच्या, नंतर पतीच्या, विधवा झाल्यास मुलाच्या आज्ञेचे पालन करावे, असे म्हटले जाते. भारत आणि इतर आशियाई संस्कृतींमध्ये अशाच प्रकारची समानता आहे. दक्षिण कोरियाने विकासाचा मार्ग धरून ७० वर्षपिक्षा जास्त काळ झाला असला तरी पारंपरिक विचारसरणीचा पगडा कायम आहे. त्यांच्या संस्कृतीत विवाहित महिलांनी सासू-सासऱ्यांचा अनादर करणे, एकटीने घराच्या परिसरात घुटमळणे, संततीबाबत निर्णय घेणे चांगले मानले जात नाही.
दक्षिण कोरियामध्ये वेतनाच्या बाबतीत महिला-पुरुष यांच्यात खूप अंतर आहे. तेथील स्त्रिया पुरुषांपेक्षा दोनतृतीयांश कमावतात, तर जपानमध्ये महिलांची कमाई पुरुषांच्या तुलनेत तीनचतुर्थांश आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, समृद्धी आणि पाश्चात्त्य देशांतील संधी असे असूनही आशियातील सर्वात प्रगत देशांवरील पितृसत्ताक परंपरेची पकड सैल झालेली नाही. त्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपानी तरुणी लग्न करण्यास अनुत्सुक आहेत. काही जणी तर या सर्व परंपरांपासून मुक्तीसाठी पाश्चात्त्य देशांतील पुरुषाशी लग्न ही एक संधी म्हणून पाहत आहेत.