मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे डेस्टीनेशन विवाहसोहळा पार पाडला. पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांच्या विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे.
पीव्ही सिंधूने अद्याप इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नव्या जोडप्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांच्या विवाहाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सिंधू आणि व्यंकटदत्ता एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये दिसतय की, सिंधूने गोल्डन क्रीम कलरची साडी परिधान केली आहे आणि दक्षिणात्य परंपरेप्रमाणे दागिनेही परिधान केले आहेत. तर तिचा नवरा वेंकट दत्त साईनेही पारंपारिक पोशाखात दिसत आहे. दोघेही हात जोडत गजेंद्र सिंह यांचे आशिर्वाद घेत आहेत.
गजेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, ‘उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत आपली बॅटमिंटन चॅम्पियन, ऑलिम्पियन पी. व्ही. सिंधूच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला. मी या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला’, असे त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय.
दरम्यान, लग्नसोहळ्यात फक्त निवडक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आता मंगळवार 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये क्रीडा जगताशिवाय, चित्रपट आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्ती देखील उपस्थित राहू शकतात.
Pleased to have attended the wedding ceremony of our Badminton Champion Olympian PV Sindhu with Venkatta Datta Sai in Udaipur last evening and conveyed my wishes & blessings to the couple for their new life ahead.@Pvsindhu1 pic.twitter.com/hjMwr5m76y
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) December 23, 2024