कोरेगाव भीमा : हवेली तालुक्यातील बकोरी येथील देवराई बनराई प्रकल्पाला समाजकंटकांनी पुन्हा एकदा आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल ५ हजार झाडे आणि ठिबक पाइपांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हजारो पक्षी, सरपटणारे प्राणीही यामध्ये होरपळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचारी यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठीचे यंत्र आणले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
तब्बल २ तासांच्या अथक प्रयात्नानातर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कमलेश यांनी वाघोली येथील अग्निशामक कार्यालयात फोन केला आणि अग्निशामकची गाडी आणि कर्मचारी आले. परंतु डोंगरावर असणारा रस्ता खराब असल्याने गाडी वर येणे अशक्य होते. त्यातही मोठ्या कसरतीनंतर गाडी वर आणण्यात यश मिळाले. त्यानंतर अग्निशामक दलाचे गोरख दराडे, मयूर गोसावी, विश्वास दराडे, कृष्णा नांगरे यांनी आग आटोक्यात आणली.
सकाळी ८ वाजता लागलेली आग दुपारी ४ वाजता आटोक्यात आणली. तोपर्यंत १०० एकरावरील वनसंपदा जळून खाक झाली. एकूण ५ हजार झाडे व त्याबरोबर ठिबक सिंचनाचे पाइप जळाले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.