पुणे : पुण्यातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर परिसरातील पठार जवळील मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या १५ वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना २१ डिसेंबर रात्री १० ते रविवारी २२ डिसेंबर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी बाळासाहेब धानप्पा सोनावणे (वय-४८, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहतीचा भाग असलेल्या गोकुळनगर पठारावरील मैदानात अनेक जण आपली वाहने पार्क करत असतात. रविवारी पहाटेच्या सुमारास टोळक्याने मिनी बस, ट्रक, रिक्षा, टेम्पो, चारचाकी कार, हायवा अशा पंधरा वाहनांवर दगडफेक करुन त्यांचे नुकसान केले. दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेतील एका आरोपीचा पठारावरील रिक्षाचालकाशी वाद झाल्याने त्याने साथीदारासह येऊन ही तोडफोड केली. या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.