लोणी काळभोर : “संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईल देण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड-माती, चिखल, काळी-तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड-किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित-संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे प्रत्यक्षात केलेल्या कृतीतूनच होईल.” असे प्रतिपादन पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले.
ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त दरवर्षी गड-किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वेळी हवेली तालुक्यातील सुमारे 268 पेक्षा जास्त तरुण-तरुणी या स्पर्धेत सहभागी झाले होते. आपआपल्या घराशेजारी, इमारतीखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. दुर्ग अभ्यासकांनी त्याचे परीक्षण केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार (22 डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन प्राचार्य गवळी यांनी केले आहे.
यावेळी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापक संजिवनी बोरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाबाई वाळके, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर चे संचालक योगेश काळभोर, रत्नाबाई काळभोर, महिला दक्षता कमिटी अध्यक्ष संगीता काळभोर, ग्रीन फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रतीक कोळपे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष गहिनीनाथ राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित जगताप म्हणाले की, दिवाळीचे औचित्य साधून दर वर्षी ही स्पर्धा लोणी काळभोर येथे घेण्यात आली. ग्रीन फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी दिवाळीत विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देण्यात आली होती. लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी व आपल्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, छत्रपती शिवरायांनी गडकिल्यांच्या सहाय्याने केलेल्या पराक्रमाची माहिती छोट्या मित्रांना बालपणातच मिळावी. यासाठी गड किल्ले बनविण्याची स्पर्धा हा उपक्रम ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतो. या स्पर्धेत सोनाली जाधव व मोनाली जाधव यांनी प्रथम क्रमांक, शिवंभू जगताप यांनी दुसरा क्रमांक, शैलेश सोनवणे यांनी तिसरा क्रमांक, सिद्राममळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा चौथा क्रमांक, सिध्देश सागर पंडित पाचवा क्रमांक पटकावला. तसेच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या दोन्ही गावातील क्रीडा क्षेत्रात ज्या विद्यार्थीनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा 368 विद्यार्थीचा क्रिडा पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाहीर महेश खुळपे यांनी मानले.