नाशिक : आमदार छगन भुजबळ यांना मंत्रीपदाबाबत कोणी वादा केला होता आणि तसे असेल तर मंत्रीपद कुठे पळून चालले आहे, अजून राज्यसभा आहे. आताशी सरकार स्थापन होऊन चार दिवस झाले आहेत, थोडा फार दम काढायला हवा, असा सल्ला देतानाच ‘त्यांनी’ पंतप्रधान व्हावे, असे मला वाटते, अशा शब्दांत चिमटा काढत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मला जे वाटते ते होईल, असे नाही. आम्हीही पदासाठी वाट पाहिली, आम्ही काही बोललो नाही. ज्यावेळी पक्ष वेगळा झाला, तेव्हा भुजबळांना मंत्रीपद मिळाले. आम्ही नाराज होतो का? त्यामुळे बाकी कोणी नाराज होण्याचे कारण नाही. बदल होणे हा निसर्गाचा नियम आहे, अशी पुस्तीही कोकाटे यांनी जोडली.
मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना कोकाटे यांनी आपली भूमिका मांडली.
भुजबळ यांना शह देण्यासाठी तुम्हाला मंत्रीपद देण्यात आले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असल्याच्या मुद्द्यावर छेडले असता कोकाटे म्हणाले की, अजितदादांचा वादा पक्का आहे. अनेकवेळा मी मुलाखतीत सांगितलं की, ते कमिटेड पॉलिटिशन आहेत. एखादी गोष्ट करताना ते मागेपुढे पाहत नाही. मी त्यांना सांगितले होते की, तुम्ही सिन्नरमधून उभे राहा. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी सिन्नरची जागा रिक्त करून देईल. मला वाटत नाही की, ज्या ओबीसी समाजाची आपण चर्चा करतो, त्या ओबीसी समाजाच्या १७ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. १६ नेते मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला, असे म्हणता येणार नाही. अजित पवारांनी अनेक नवीन चेहऱ्याऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. अजित पवारांनी हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक होते. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, असे आपले मत असल्याचेही कोकाटे म्हणाले.
आमदार भुजबळ नाराज असतील. ते २० वर्षांपासून मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नाराज असण्याचे काही कारण नाही. त्यांचे काही गैरसमज असतील ते नाकारता येणार नाहीत. मात्र, ते गैरसमजही दूर होतील आणि लवकरात लवकर ते कामाला लागतील, असेही कोकाटे म्हणाले.
टार्गेट करण्याची गरज नाही
आमदार भुजबळ यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात. आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत शून्य स्थान आहे, असे म्हटले. तसेच भुजबळ यांनी अजित पवारांना टार्गेट केले असल्याबाबत विचारले असता कोकाटे म्हणाले की, ते चुकीचे आहे. अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही. अजित पवारांनी सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे. सर्व समाजाच्या लोकांना त्यांनी न्याय दिला आहे.