पुणे : यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीनं या विजयाचं श्रेय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलं आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांना आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. डिसेंबर महिना संपत आला, तरी बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारकडून निवडणुकींच्या आधी महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 1500 ही रक्कम वाढवून ती 2100 केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यानुसार आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही रक्कम कधी वाढवणार याबाबतही महिलांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र, आता मार्चमध्ये राज्याचं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या रकमेत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जरी अधिवेशनानंतर रक्कम जमा होईल असे सांगितले असले, तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नव्या वर्षातच हप्ता मिळण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेत लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, डिसेंबर महिना संपण्यासाठी अवघे 10 दिवस उरले आहेत. अद्यापही मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले नाही. त्यामुळेच पैसे अजून आले नसल्याचे सांगितले आहे.