बारामती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजारांची रक्कम चोरुन नग्न फोटो काढत जबरदस्तीने एटीएम सेंटरमधून रक्कम काढून घेणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राहूल धोंडीबा हुगाडे (वय – २३, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), सुमित किशोर पवार (वय – २४, रा. बांदलवाडी, ता. बारामती) आणि भूषण भास्कर रणसिंग (वय- २०, रा. मार्केट यार्ड रोड, बारामती) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ०४) विद्यार्थी (वय- २१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असून, वसतिगृहात राहतो. रविवारी सायंकाळी विद्यार्थी बारामती येथील एका मॉलमध्ये खरेदी करून दुचाकीवरून वसतिगृहाकडे निघाला होता. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला आडवून शिवीगाळ करून दमदाटी करत खिशातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली.
दरम्यान, त्याचा जाब तो विचारत असताना दुसऱ्या दुचाकीवरून दोघे तेथे आले. या तिघांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत ऊसाच्या पिकात नेले. तेथे त्याला नग्न करत त्याचे शुटींग, फोटो घेतले. ते व्हायरल करण्याची धमकी देत एटीएम केंद्रात नेहून त्याच्या खात्यातून १४ हजार ५०० रुपये काढण्यात आले व पैसे घेऊन चोरटे पसार झाले. यामध्ये त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या प्रकरणी वरील तिघांना अटक केली आहे.