वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे भावाभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस, या कारणावरून सख्ख्या भावाने छातीवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वडगाव मावळ येथील रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी घडली आहे.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदेश पारधी ऊर्फ उदेश नावाब राजपूत (वय ४५, मूळ रा. मुरवाडा स्टेशन, जि. कटनी, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नटू शबस्ता नाबाब राजपूत (वय ४०) असे आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उदेश राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्खे भाऊ आहेत. ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते. उदेश यांच्या मुलीच्या मुलीचे आरोपी याच्या मुलाबरोबर लग्न करण्याची मागणी आरोपी करत होता. यातून शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने नटू याने मोठ्या भावाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून केला. या घटनेनंतर आरोपी नटू हा घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.