पुणे : पुण्यामधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच, विशेषत: महामार्गावरील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी रिंग रोड तयार केला जात आहे. या रिंग रोडलगत ११७ गावांमध्ये विकास केंद्रे उभारली जाणार असून याचा नकाशा देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केला आहे. पुढील ६० दिवसांत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.
पुणे रिंग रोडमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मुंबई आणि बंगळुरू येथे जाणारी वाहतूक पुणे शहराच्या बाहेर वळवणे शक्य होणार आहे. पुणे रिंग रोड १३७ किमीचा असणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, पुरंदर, भोर आणि वेल्हे या तालुक्यांतील ११७ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
साधारण ६६८ चौरस कि.मी.च्या परिसरात विकास केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्रांचा नकाशा जाहीर करण्यात आला असून स्थानिकांना पुढील ६० दिवसांत यावर हरकती नोंदवता येणार आहेत. दुसऱ्या बाजूला विकास केंद्रांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्यात शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, खुल्या जागा, क्रीडांगणे, दळवळणाच्या सुविधा, सेवा उद्योग, औद्योगिक वसाहती, स्मशानभूमी इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे.