पुणे : भीमथडी जत्रेला 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या जत्रेला राज्यासह संपूर्ण देशभरातून लोक हजेरी लावतात. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनीसुद्धा पुण्यातील भीमथडी जत्रेला भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनकरुन संवाद साधला. त्यावेळी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
शरद पवार हे आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत उपस्थित होते. यावेली साहित्य संमेलनाच्या मंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावल्याची माहिती आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या बीड प्रकरणावर लक्ष घालण्याची विनंती केली, तसेच पुण्यातील भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलन या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमात येण्याची विनंती केली. दिल्लीमध्ये होणा-या साहित्य संमेलनाबाबतही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी फडणवीस यांना केले.
भीमथडी जत्रेचे यंदाचे हे 18 वे वर्ष आहे. या जत्रेत दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची कलासंस्कृती गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल अशा गोष्टी पुणेकरांना अनुभवायला मिळत आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात – ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी भरड धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या जत्रेला राज्यातील 18 पेक्षा अधिक जिल्ह्यांसह देशातील जवळपास 12 राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना 325 स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महिला उद्योजिकांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून दरवर्षी या जत्रेचं आयोजन केले जातं.