मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोघेजण एकत्रित दिसले. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चाणा उधाण आलं आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्या भगिनी जैजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा दादरमधील राजे शिवाजी महाविद्यालयात पार पडला. यानिमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलेले दिसून आले. राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवत ठाकरे कुटुंबिय एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आजुबाजूला उभे होते. लग्नसोहळ्यात त्यांनी गप्पा मारल्या आणि सोबत वेळही घालवला.
भाज्याच्या लग्नाला दोन्ही मामांनी हजेरी लावत कौटुंबिक जिव्हाळा कायम असल्याचे दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसाची इच्छा आहे. पण आज राजकीय नाही तर कौटुंबिक कारणामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दिसून आले. यांच्या भेटीनंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होणार का? याची जोरदार चर्चा सुरु आहे.