पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यसरकारने एमपीएससी सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीच्या 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरु असतानाचा एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या जाहिरातीमध्ये बदल करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा संपली आहे. अशा विद्यार्थ्यांना आता या निर्णयाने पुन्हा एक संधी मिळणार आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.