पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकाच्या आवारात पकडले. अमोल रवी आडम (वय २४, रा. प्रथमेश अपार्टमेंट, शंकरनगर, कात्रज) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आडम आणि साथीदाराने १७ डिसेंबर रोजी कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. गुन्हा केल्यानंतर आडम मूळ गावी सोलापूरला जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि राहुल तांबे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, शंकर संपत्ते, सागर केकाण, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, शरद गोरे यांनी ही कारवाई केली.