पिंपरी (पुणे) : लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मुटकेवाडी, चाकण येथे घडली. याबाबत तरुणीने लिहिलेली चिट्ठी सापडली असता चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रियंका ऊर्फ माही (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सातपुते (वय ३१, रा. मुटकेवाडी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०२३ ते १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आरोपी प्रकाश याने फिर्यादी यांच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यानंतर तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.