अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील अनिल लेतू मेश्राम (वय 41) याला मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख (केळापूर) यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 10 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. भादंवि कलम 307 मध्ये 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 3000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 3 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
भादंवि कलम 353 अंतर्गत 1 वर्षाची शिक्षा व 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 1 महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. भादंवि कलम 333 अंतर्गत 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी 2 महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. आरोपी अनिल मेश्राम यास सर्व शिक्षा एकत्रीतपणे भोगाव्या लागणार आहेत. सरकारची बाजू केळापूर न्यायालयाचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी भक्कम पणे मांडली.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 26 नोव्हेंबर 2018 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतू मेश्राम याच्यावर गैरजमानती वाॅरंटची (NBW) बजावणी करण्यासाठी पोलिस शिपाई राजेंद्र बाजीराव कुडमेथे, पोलिस शिपाई मधुकर मुके व पोलिस काॅन्स्टेबल प्रमोद खुपरे शासकीय वाहनाने आरोपीच्या गावी गेले होते. त्यावेळी आरोपी हा वाॅरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करत होता. त्यानंतर आरोपीने पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यात वार करून त्यांना जागीच ठार केले. पोलिस शिपाई मधुकर मुके याने संबंधित घटनेची तक्रार मारेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली.
त्यावरुन आरोपी अनिल लेतू मेश्राम विरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात अपराध क्रंमाक 399/2018 भादंवि कलम 302, 307, 353, 333, 332 व 324 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
प्रस्तुत प्रकरणात अभियोजन पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासले. अभियोजन पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध केल्याने आरोपी अनिल लेतू मेश्राम याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दिपक गावंडे यांनी सहकार्य केले.