सांगली : बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रक उलटून भीषण अपघात जाळायची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त बंगळुरूहून संबंधित कुटुंब जतला गावी निघाले होते. त्यावेळी कंटनेर ट्रक हा कारवर उलटल्याने ६ जणांचा मृत्यू झाला.
या अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की, बंगळुरू जिल्ह्यातल्या नेलमंगळा तालुक्यात तळकेरेजवळ हा अपघात झाला. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त इग्गाप्पागोळ कुटुंब हे आपल्या गावातील घरी निघाले होते. त्यांच्या कारवर कंटेनर ट्रक पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली. यामध्ये कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुली, १६ वर्षाचा मुलगा, पती-पत्नी आणि भावाच्या पत्नीचा समावेश आहे. चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई चंद्रम इगाप्पागोळ, मुलगा गण, मुली दिक्षा, आर्या आणि चंद्रम यांच्या भावाची पत्नी विजयालक्ष्मी असे अपघातात मृत्यू पावलेल्या सहा जणांची नावे आहेत. चंद्रम इगाप्पागोळ यांनी तीन महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील मोराबागी गावचे रहिवाशी चंद्रम इगाप्पागोळ हे बंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. ख्रिसमस सुट्टीमुले गावी येत असताना त्यांच्यावर काळाने झडप मारली. अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.