पुणे: पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने २ डिसेंबरपासून वसुलीसाठी खास मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेतील दहा दिवसांत पालिकेच्या तिजोरीत ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन खात्याने २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेसाठी थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यानुसार २ डिसेंबरपासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेली स्वतंत्र वसुली पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
त्यानुसार दि. २ ते १३ डिसेंबर या दहा दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे ३१७ इतक्या मिळकतींना भेट देण्यात आली व ४० कोटी ६८ लाख ५४ हजार २९९ रुपये इतका कर वसूल करण्यात आलेला आहे. तसेच ७५ इतक्या मिळकती सीलबंद करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,८४,६२२ मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८४१.७७ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे.