पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे माजी सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवाज उठवला. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करताना म्हटलं आहे.
दरम्यान, माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या राजकीय गुंडाकडून करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. तसेच ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते वाल्मीक कराडांनी ३२ खून केल्याचा दावाही उत्तम जानकर यांनी केला आहे.
पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानामधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. काही राजकीय नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील राजकीय गुंडांकडून करण्यात आली आहे. वाल्मीक कराड या व्यक्तीनं ३२ खून केले आहेत. वाल्मीक कराड हे
मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. या माणसाची प्रचंड दहशत आहे. असा गंभीर आरोप उत्तन जानकर यांनी केला आहे.
वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून ३२०० लोकांवर गुन्हे दाखल
वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे ३ हजार २०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक आयएएस अधिकारी वाल्मिक कराड यांच्या घराबाहेर दरबार भरवतात. इतकी मोठी दहशत वाल्मीक कराडची आहे. याला राजकीय पाठबळ धनंजय मुंडे यांचं आहे. असा घणाघातही उत्तम जानकर यांनी केला आहे.