-राहुलकुमार अवचट
यवत : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामाच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील डाळिंब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ‘ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन’ डाळिंब येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश विठ्ठल गायकवाड यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता.
गेल्या वर्षी यवत परिसरातहा दिन साजरा करण्यात आला होता. तर यावर्षी ज्वारी प्रकल्पामध्ये डाळिंब गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याविषयी कृषी सहाय्यक विनायक जगताप यांनी पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेतकरी पोपट बबन म्हस्के यांनी सांगितले की, कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आमचे ज्वारीचे पीक खुप चांगले आहे. नेहमीच्या पद्धतीपेक्षा आम्हाला 30 ते 40 टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. यावेळी कृषी सहाय्यक विनायक जगताप, पंढरीनाथ कुतवळ, कृषी लोकसेवा शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पोपट म्हस्के, महादेव म्हस्के, लहूनाथ म्हस्के, दत्तात्रय म्हस्के , गणेश गायकवाड, शंकर काळे, लक्ष्मण शितोळे, सुखदेव गायकवाड, सतीश म्हस्के, रिसोर्स फार्मर युवराज जगताप यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाने राबवलेल्या प्रकल्पाबद्दल कृषी विभागाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.