पुणे : पुणे शहरातील पब संस्कृतीला आमचा विरोध नाही, मात्र पबवर निर्बंध आवश्यक हवेत, असे मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. पोलिस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या कॉफी विथ सीपी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन पोलीसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात ख्रिसमस आणि थर्टी फस्ट येत असल्याने शहरातील सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
पुढे बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुण्यात परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. महानगरात अनेक सोयी सुविधा निर्माण होतात. पब हा प्रकार किंवा व्यवसाय त्यापैकी एक आहे. पबमुळे संस्कृतीला धक्का पोहोचतो. गैरप्रकार होतात, अशी टीका करण्यात आली. पबमुळे पुणेकरांच्या अस्मितेला अजिबात धक्का पोहोचणार नाही. कारण मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर आहेत. पबला विरोध नाही. मात्र, पबच्या नावाखाली सुरू गैरप्रकारांना पोलिसांचा विरोध आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील आवाजामुळे सामान्यांना त्रास होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पबचालकांसाठी नियमावली ठरवण्यात आली. पब चालक, सांगीतिक कार्यक्रम किंवा जाहीर ठिकाणी ध्वनिवर्धक, लेझर झोत वापरणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उत्सवाच्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या ध्वनिवर्धकांबाबत पुणेकरांनी जागरुक होऊन विरोध करायला हवा.’
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा यांच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. पुण्यात अंधा-या जागा जास्त आहेत. त्या जागा प्रकाशित व्हाव्यात त्या दृष्टीनेही आमचा महापालिकेसोबत पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. बोपदेव येथील बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील 22 टेकडयांवर सुरक्षेच्या योजनेच्या अनुषंगाने काम सुरु आहे’,अशी माहितीही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.