लोणी काळभोर: आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवर उपाय म्हणून भारत सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करून ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल विकण्यास 9 डिसेंबरपासून सुरुवात केली आहे. परिणामी सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या पेट्रोलपंपांवर लालभडक रंगाच्या पेट्रोलचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे परकीय चलनात मोठी बचत होऊन भारताला मोठा फायदा होणार आहे. मात्र, गाडीच्या टाकीतील पेट्रोलमध्ये पाण्याचा अंश गेल्यास जुन्या मॉडेलच्या वाहनांची इंजिने जाम होण्याचा धोका वाढला आहे.
भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून देशांतर्गत किमती आटोक्यात ठेवण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भारत पेट्रोलियमच्या पंपांवर लाल रंगाचे तेल मिळत होते. आता हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपन्यांच्या पंपांवरही मिळत आहे. तांत्रिक भाषेत इथेनॉल ब्लेण्डेड मोटर स्पिरीट (इबीएमएस) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचे प्रमाण २० टक्के झाले आहे. त्यामुळे पेट्रोलचा रंग लालभडक तथा कोकमसारखा झाला आहे. तेलाचा रंग बदलल्याने पंपांवर ग्राहकांकडून शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी खुलासा करण्याची, तसेच पंपांवर माहिती फलक लावण्याची मागणी होत आहे.
इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने जुन्या बनावटीच्या इंजिनांबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन पंपचालकांनी केले आहे. या पेट्रोलमध्ये काही थेंब पाणी जरी मिसळले, तरी त्याची जेली तयार होते, त्यामुळे गाडीचे इंजिन तत्काळ ब्लॉक होते. बीएस ६ श्रेणीतील दुचाकींना मात्र याचा फटका बसणार नाही. त्यामुळे जुन्या बनावटीच्या वाहनाच्या मालकांनी टाकीमध्ये पाणी मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पंपचालकांनी केले आहे.
इथेनॉल म्हणजे नेमकं काय?
इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे. यामुळे पर्यावरणाची होणारी हानी कमी होते. यात अल्कोहोल असते. अमेरिकन सरकारच्या वेबसाइटनुसार, मका , ऊस आणि बीट यांच्यापासून हे इंधन तयार केले जाते. कारण त्यात साखर असते. इंधन म्हणून वापर करण्यासाठी त्यात पेट्रोलियम पदार्थ मिसळले जातात.
इथेनॉलचे फायदे
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे खनिज तेलाची आयात कमी करावी लागेल व खर्चात कपात होईल. सरकार इथेनॉलच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे. पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम होत आहे. इथेनॉलचा ऑक्टेन नंबर अधिक असल्यामुळे ते वाहन आणि पर्यावरणासाठी अनुकूल असते. त्याचा इंधन म्हणून वापर केल्यावर कार्बन मोनॉक्साइडचं उत्सर्जन 35 टक्क्यांनी कमी होते. तसेच सल्फर डाय ऑक्साइडचे उत्सर्जनही कमी होते. त्यामुळे प्रदूषण घटण्यास उपयोग होणार आहे.
इथेनॉल मिश्रणाचे तोटे
इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे मायलेज कमी असते . इथेनॉलमुळे वस्तूंना गंज लवकर चढतो. इथेनॉल पाण्याकडे खुप आकर्षिला जातो. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात आल्यास इथेनॉलचा संपूर्ण भाग पेट्रोलपासून वेगळा होतो. त्यामुळे पाणी आणि पेट्रोलचे दोन वेगळे थर तयार होतात. त्यामुळे, इथेनॉलच्या अतिवापरामुळे वाहनाचे आणि पर्यायाने इंजिनचे भाग खराब होऊ शकतात.
हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियमसह सर्वच सरकारी तेल कंपन्यांनी ई-20 श्रेणीतील पेट्रोलचा पुरवठा सुरू केला आहे. यामध्ये इथेनॉलचे प्रमाण हे 20 टक्के असल्याने पेट्रोलचा रंगही लाल झाला आहे. इथेनॉल जरी पर्यावरणपूरक असले, तरी त्याचे काही फायदे किंवा तोटे असतील. त्याबाबत तेल कंपन्यांनी जणजागृती करावी. तसेच ग्राहकांनी नवे पेट्रोल वापरताना गाडीच्या इंधन टाकीमध्ये पाणी जाऊ नये, याची दक्षता घ्यावी.
ध्रुव रुपारेल (जिल्हाध्यक्ष – पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे)