पुणे: जिल्ह्यातील जवळपास ३ हजार १३७ पिण्याच्या पाण्याचे स्रोत जैविक व रासायनिकदृष्ट्या गावातच तपासणी करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी, आरोग्य कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील समूह समन्ययक व गट समन्वयक यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, प्रशिक्षित झालेले प्रशिक्षक तालुकास्तरावरील महिला व जलसुरक्षक यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या मदतीने सर्व जलस्रोतांची तपासणी होणार आहे. या सर्व उपक्रमांचे सहनियंत्रण होणार आहे. गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी सहनियंत्रण करणार आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजार पिण्याच्या पाण्याचे स्रोत असून, आरोग्य विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व पंचायत विभाग यांच्या समन्वयाने रासायनिक व जैविक तपासणी करून तपासणीची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत पाणी नमुने जलसुरक्षांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळेत पाणी नमुने प्रयोगशाळेत नेणे आवश्यक आहे.
प्रत्येक गावात अंगणवाडी आणि आशा कर्मचारी व बचत गटाच्या सदस्य अशा पाच कुशल महिला व जल सुरक्षकांनी पिण्याच्या पाणी नमुन्याची ग्रामपंचायतस्तरावर तपासणी करावी. याकरिता जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी, आरोग्य कर्मचारी व जल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील समूह समन्वयक व गट समन्वयक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित झालेले प्रशिक्षक तालुकास्तरावरील महिला व जलसुरक्षक यांना प्रशिक्षण देणार आहेत.