नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. आता या योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे. राज्य सरकारने योजना सुरु करताना महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निमित्ताने सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही निवडणुकीत दिलेली आहेत. ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, त्यामधील एकही योजना बंद होऊ देणार नाही. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले आहे. हे अधिवेशन संपल्याबरोबर लगेच डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करणार आहोत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या योजनेसाठी काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत, असे लक्षात आले आहे. आपल्या समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात , तशा काही वाईट प्रवृत्ती देखील असतात. जर कोणी एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल, तर तो जनतेचा पैसा आहे. तुमची आमची जबाबदारी की, तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. जर माणसांनीच 9 खाती काढली, तर त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचे, त्याला आपण लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. जो माणूस बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2100 रुपये कधीपासून मिळणार?
महायुतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महिलांना येत्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणे रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये 1500 रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.