पुणे : तो काय लय मोठा जहागीरदार आहे का? आतमध्ये येवुन जेवण करेल. असे म्हणाल्याचा राग मनात धरून मुलाने जन्मदात्या वडिलांचा लाठी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना खोपडेवाडी (पो.वरोती ता. हवेली जिल्हा पुणे) येथे 25 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी मुलाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावास व साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
रमेश विठ्ठल जोरकर (वय- 55,) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर प्रकाश रमेश जोरकर (वय-29) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संगीता रमेश जोरकर (वय-48, सर्व रा. रा. खोपडेवाडी पो. बरोती ता. वेल्हा जि.पुणे) यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम 302,323,504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता व रमेश जोरकर हे नात्याने पती पत्नी आहेत. तर आरोपी प्रकाश हा विवाहित असून तो रमेश जोरकर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. जोरकर कुटुंब हे खोपडेवाडी परिसरात राहतात. दरम्यान, प्रकाश याने पत्नीस त्याच्यासाठी व त्याच्या मित्रांसाठी जेवणाची तीन ताटे वाढून आणण्यास 25 नोव्हेंबर 2019 ला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांगितले होते. तेव्हा रमेश जोरकर म्हणाले, तो काय लय मोठा जहागीरदार आहे का? आतमध्ये येवुन जेवण करेल.
दरम्यान, वडील रमेश जोरकर असे म्हणाल्याचा राग मनात धरून आरोपी प्रकाशाने शिवीगाळी, दमदाटी करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी भांडणे सोडविण्यासाठी प्रकाशची पत्नी व त्याची सावत्र आई संगीता प्रयत्न करीत होत्या. तेव्हा आरोपींनी दोघींनाही ढकलुन दिले. त्यानंतर आरोपी प्रकाशने वडील रमेश जोरकर यास घरातुन बाहेर ओढत आणले. व अंगणातील काठीने पाठीवर मारून पोटात लाथा मारल्या. या मारहाणीत रमेश जोरकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रमेश जोरकर यांच्यावर औषधोपचार चालु असताना रुग्णालयात मृत्यू झाला.
याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रकाश जोरकर याला तत्काळ अटक केली होती. सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील ॲड. निवेदीता काळे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड विधायक कलम 304 (2) खाली 6 वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, भारतीय दंड विधायक कलम 323 खाली 1 वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस.आर पहाडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यास सरकारी वकील ॲड. निवेदीता काळे यांना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे , सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षकनितीन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत, पोलीस अंमलदार दिपक जाधव व उमेश जगताप यांचे बहुमुल्य योगदान मिळाले.