-पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता.शिरुर येथील श्री महागणपतीच्या मूर्तीस व मंदिरात विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री महागणपतीचे चतुर्थीनिमित्त दिवसभर हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक करण्यात येऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सध्या मार्गशीर्ष महिना सुरु असल्याने सकाळच्या अभिषेकानंतर विविध धार्मिक विधी करण्यात आले. सकाळी 7 वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी 12 वाजता महापूजा करण्यात देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महानैवेद्य दाखविण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा पाचुंदकर यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सचिव डॉ.तुषार दौडकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर आदिसह देवस्थानचे पुजारी, कर्मचारी व भाविक उपस्थित होते. येथील गणेशभक्त तथा प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात व परिसरात विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
दरम्यान, चतुर्थीमुळे मंदिर परिसरात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.