पुणे: एसटीचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या वर्षात सुमारे ३,५०० नव्या साध्या लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली.
सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता असून, एसटीच्या ताफ्यामध्ये आज रोजी १४ हजार बसेस असून कोरोनापूर्वी एसटीकडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षांत एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या नादुरुस्त होण्याचे झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे महामंडळाकडून प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होत नाही. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस -दोन नादुरुस्त होणे, बसेसची दोन- तास वाट पाहत बसणे, अशा तक्रारी कमी होतील, असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केले.
मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूरमधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रीटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणे बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल, असा गौरव गोगावले यांनी यावेळी केला. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.