लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरून दुचाकीवरून शाळेत जात असताना कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची धक्कादायक घटना मागील दोन वर्षापूर्वी घडली होती. या दुर्घटनेत दोन शाळकरी सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. “त्या” मुलींच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील नवपरिवर्तन फाउंडेशनच्यावतीने नेहमी प्रयत्न केले जात होते. अखेर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यांना शनिवारी (ता. 14 डिसेंबर 2024 ) यश आले असून न्यायालयाने “त्या” मुलींच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून 17 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यू इंडिया विमा कंपनीला दिले आहेत. त्यामुळे नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गायत्री नंदकुमार शितोळे (वय-17) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-10, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. गायत्री व राजश्री या दोन्ही बहिणी लोणी काळभोर येथील शाळेत शिक्षण घेत होत्या. गायत्री ही पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीला तर राजश्री ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
नेहमीप्रमाणे गायत्री व राजश्री यांना शाळेत सोडविण्यासाठी त्यांचे मामा शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत घेऊन चालले होते. दरम्यान, त्यांची दुचाकी लोणी स्टेशन चौकात आली असताना, त्यांच्या दुचाकीला कंटेनर ने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघींचाही जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (20 ऑगस्ट 2022) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेमुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परिसरात शोककळा पसरली होती. तर नागरिकांकडून या दुर्घटनेची हळहळ व्यक्त केली जात होती. तर या प्रकरणी कंटेनर चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शितोळे कुटुंबाने आक्रमक भूमिका घेऊन कंटेनर चालक व मालकावर गुन्हा दाखल करून अटक करा. तो पर्यंत अंत्यविधीसाठी मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मुलींच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन समजूत काढली. व आपण त्यांच्यावर कडक कारवाई करायला लावू. तसेच तुमचे झालेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही. मात्र फास्ट ट्रॅक वर केस चालवून आरोपींना शिक्षा व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासन चित्तरंजन गायकवाड यांनी दिल्यानंतर शितोळे कुटुंबाने मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
View this post on Instagram
नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी या दुर्घटनेतील कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली होती. गायकवाड यांनी हा खटला सरकारी वकील ॲड. वैभव धायगुडे यांच्या मार्फत फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केला होता. या खटल्यात ॲड. वैभव धायगुडे यांनी कंटेनर चालकाने वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वेगाने, निष्काळजीपणे, वाहतुकीचे नियम तोडून गाडी चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. व या अपघातातील मुलींच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे मुलींच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. असे युक्तिवाद ॲड. वैभव धायगुडे यांनी न्यायालयात केले होते. हे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शितोळे कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून न्यू इंडिया विमा कंपनीला 17 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट येथील त्या दोन मुलींचे वडील नंदकुमार शितोळे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन, त्यांचे सांत्वण केले. तसेच प्रदीप कंद यांनी नंदकुमार शितोळे यांना रोख पन्नास हजार रुपयांची मदतही दिली होती.
नवपरिवर्तन फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक
दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात मृत्यू झाल्याने शितोळे कुटुंबावर दुख:चा डोंगर तर कदमवाकवस्ती गावावर शोककळा पसरली होती. शितोळे कुटुंबावर पडलेले दुख: हे कधीही भरून निघणारे नव्हते. मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी नवपरिवर्तन फाउंडेशनने घेतली होती. नवपरिवर्तन फाउंडेशनने ती जबाबदारी यशस्वी पार पाडली असून त्या कुटुंबाला न्यायालयाने आर्थिक मदत देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. त्यामुळे शितोळे कुटुंबाला लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. तर नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व त्यांचे सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोणी स्टेशन येथील त्या दोन सख्ख्या शाळकरी बहिणींच्या कुटुंबाला लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. याचे एकीकडे समाधान वाटत असले तरी शितोळे कुटुंबाचे हे दुख: खूप मोठे आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, फुरसुंगी असा शिवरस्ता होणे खूप गरजेचे आहे. हा रस्ता लोणी गावातील महादेव मंदिर, घोरपडे वस्ती, बोपदेव मंदिर, पांडवदंड, गायकवाड वस्ती व कवडीपाट टोल नाक्यापर्यंत बनविण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर या रस्त्याचा 50 हजारूहून अधिक नागरिकांना फायदा होईल. व नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल. व शाळकरी विद्यार्थी सुखरूप शाळेत पोहचतील.
-चित्तरंजन गायकवाड (संस्थापक अध्यक्ष – नवपरिवर्तन फाउंडेशन, लोणी काळभोर, ता. हवेली)