पुणे : सध्या महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या पर्वतरांगेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा थेट प्रभाव भारतातील हवामानावर दिसत आहे. ज्यामुळं पर्वतीय भागासह मैदानी क्षेत्रामध्येही तापमानात घट नोंदवली जात आहे.
मागील काही दिवसांपासून तापमानात हळूहळू घट झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्रीच्या वेळी थंडी वाढली आहे. पहाटेच्या वेळी काही भागात दवबिंदू पडत आहे. त्यामुळे अधिकच थंडी जाणवत आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमी तापमान वाशिम जिल्ह्यात नोंदवले गेले. या ठिकाणी 5.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर येथे 7.4 तर पुण्यात 8.9, नाशिकमध्ये 9 अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात सोमवार पाठोपाठ मंगळवारी देखील थंडीचा कडाका जाणवला. एनडीए भागाचे तापमान मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शहराच्या किमान तापमानात काही भागात मंगळवारी देखील घट दिसून आली. एनडीए येथे सोमवारी 6.1 तर मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं.
उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणचा पारा हा शुन्याखाली गेला आहे. यामुळे राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी वाढ होणार आहे.