संगमनेर : संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे चांदशावली दर्ग्याच्या घुमटाला कळस चढवण्याचे काम सुरू असतानाच अचानक घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तसेच तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सुभाष तुकाराम नरवड (वय-२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच अनिल गोयल तिरवडल (वय-२५) हा गंभीर जखमी असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अमोल व्यंकटी चुडामन (वय-१८) बालाजी मारुती गुलवड (वय-३०) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्ग्याच्या नूतनीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार प्रकाश धुळगंड यांनी घेतले आहे. मात्र काही कारणास्तव त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तेथील डॉ. प्रदीप कुटे यांच्या रुग्णालया दाखल करण्यात आले. सुभाष तुकाराम नरवडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच अनिल तिरवडल याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. प्रदीप कुटे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, घारगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेबाबत पंचनामा केला आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. या गुन्ह्यात दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक भदाणे म्हणाले आहेत. डॉ. प्रदीप कुटे, डॉ. सोनाली कुटे व त्यांची टीम जखमी कामगारांवर उपचार करत आहेत. ठेकेदार प्रकाश धुळगंड यांच्याशी संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वी दोन वेळा या दर्ग्याचे बांधकाम कोसळले होते.
याबाबत उद्योजक बाबासाहेब कुटे यांनी सांगितले कि, घुमटाला कळस बसवण्याचे काम काय टेक्निकल नव्हते. त्यामुळे स्लॅब कोसळला असावा असा त्यांचा अंदाज आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी हे काम आपण पूर्ण करण्यास सांगितले होते. तब्बल २१ लाख रुपये ग्रामस्थ देणार आणि जो काही अंदाजे ६० लाख रुपयांचा खर्च आपण वैयक्तिक करणार होतो.
मात्र, ग्रामस्थांनी सुरुवातीला दिलेले १७ लाख रुपये बांधकामासाठी दिले होते. त्याचे काम आपण केले. राजकारण मध्येच आल्याने हे काम आपल्याला करू दिले नाही. मारुती मंदिरासाठी तब्बल ७६ लाख रुपये वैयक्तिक खर्च केला आहे. अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती, अशी खंत कुटे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.