मुंबई : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटनं दिलेल्या धडकेत तीन नव्हे तर १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी अंतिम नसून, यामध्ये अद्याप कुणी बेपत्ता असेल किंवा मृत असेल याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
हा अपघात झाल्यानंतर यंत्रणेनं बचावकार्य हाती घेतलं होतं. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
नेव्हीच्या बोटीच्या इंजिनचे टेस्टिंग सुरू होतं
दरम्यान, नेव्हीच्या ज्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिली तिच्या संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती. त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली. नवीन इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नेव्हीकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी नीलकमल बोटीला नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीची धडक बसली आणि प्रवाशांची बोट उलटली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरहून अधिक प्रवासी आणि पाच बोटीचे सदस्य होते. समुद्रात आजूबाजूला असलेल्या इतर बोटींनी मदतीसाठी वेळीच धाव घेतल्यामुळे ११० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून रात्र झाल्यामुळे शोधकार्यामध्ये अडचण येत असल्याने या घटनेत अजून किती लोक बेपत्ता आहेत किंवा आणखी कुणाचा जीव गेला आहे का? याची माहिती गुरुवारी सकाळी समोर येणार आहे.