पुणे : पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठत मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यानंतर आता विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
पत्रकारांकडून तुमचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, असा प्रश्न विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलतना म्हणाले कि, अजित पवारांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे, असा टोलाही विजय शिवतारे यांनी लगावला आहे.
शिवसेना हे माझं कुटुंब : विजय शिवतारे
पुढे बोलताना म्हणाले, दोन दिवस आधी मला मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना दिली असती तर काहीच वाटलं नसतं. परंतु माझे सर्व कुटुंबीय आणि मतदारसंघातील कार्यकर्ते ३०० हून अधिक गाड्या घेऊन नागपूरला आले होते. या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता होती.
मला वैयक्तिक हितासाठी मंत्रिपद नको होते, तर राज्याच्या विकासात योगदान देण्याची माझी क्षमता आहे आणि त्यासाठी मला मंत्रिपद मिळावं, अशी माझी इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. मी आता सर्व कार्यकर्त्यांना समजावलं असून शेवटी मी शिवसेना हे माझं कुटुंब समजतो, असं आमदार विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.