कर्जत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाविरोधांत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, सध्या तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर्जत तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत एका २३ वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने इंटरनेटच्या माध्यमातून या अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यावर पीडित मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाने अल्पवयीन पीडित मुलीशी आधी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने या मुलीला तिच्या आई- वडिलांना ठार मारून टाकण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान त्याने त्याच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ चित्रित करून तो इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.