पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रवेशासांठी शाळा नोंदणी प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. आरटीईच्या पोर्टलवर शाळांना नोंदणी करता येणार आहे. याकरिता शाळांना तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी होणारी दिरंगाई आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आरटीईची प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होऊ शकते. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर प्रवेशाची लॉटरी जाहीर होईल. साधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नियमित वेळेत आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील.
आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यासंदर्भात शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बुधवार, १८ डिसेंबरपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळा नोंदणीसाठी साधारण तीन आठवड्यांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर तत्काळ विद्यार्थी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय