छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैठण तालुक्यातील आडूळ येथे दोन शाळकरी सख्ख्या भावांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आडुळ येथे मंगळवार १७ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. जय कृष्णा फनसे (वय-१०) आणि प्रणव कृष्णा फनसे (वय-६, दोघे रा. आडुळ, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेने आडूळ गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडुळ येथील चौथीमध्ये शिकत असलेला जय फणसे तसेच पहिलीमध्ये शिकत असलेला प्रणव फणसे हे दोघे सख्खे भाऊ आहे. ते दोघेजण आपल्या आईसोबत जमवाडी जवळील रजापूर शिवारातील विहिरीवर गेले होते. त्यावेळी दोघे भाऊ-भाऊ खेळत असताना विहिरीजवळ गेले.
दरम्यान, कठडे नसलेल्या विहिरीमध्ये पडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र, दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडला नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करून जवानाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे.
त्यानंतर आडुळ येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी एस. डी. नागरे यांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पाचोड पोलिस करत आहेत.