पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावत्र वडिलांकडून मुलाला होणारी मारहाण, मानसिक त्रास याला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर येथे ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणाचा तब्बल ३ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय-३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी त्याची मावशी संगीता राजु बागवे (वय-५१, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीने दुसरा विवाह केला होता. सुरुवातीला तिची मुले फिर्यादी संगीता मावशी कडेच रहात होती. ती मोठी झाल्यावर ते आईकडे राहायला गेले. शब्बीर प्लम्बिंगची कामे करीत असे. विजय कसोटे हा शब्बीर शेख याचा सतत छळ करत असत. त्याला कोणत्याही कारणावरून मारहाण करीत असे. त्याला मानसिक त्रास देत असत. त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे खोट्या तक्रारी करत असे.
दरम्यान, या होणाऱ्या त्रासाला कंटाळून शब्बीर याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी या त्यांच्या राहत्या घरी गेल्या. ससून रुग्णालयात शब्बीर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होता. त्यावेळी रुग्णवाहिकेत फिर्यादी यांना शब्बीरच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली.
त्यामध्ये त्याने आपल्या सावत्र वडिलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे लिहिले होते. पोलिसांनी पंचनामा करत असताना मरण पावलेल्या शब्बीरच्या कपड्यांची देखील तपासणी करण्यात आली नाही, असे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर करीत आहेत.