बीड : बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा आरोपी विष्णू चाटे यास पोलीसांनी अटक केली आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) माजी तालुकाध्यक्ष असून त्याच्यावर खंडणी मागणे आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पाठलाग करुन चाटे याला अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजुनही तीन आरोपी फरार आहेत.
विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. त्यानंतर चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचा समजला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गाजताना दिसत आहेत.