पुणे : प्रवाशांकडून सातत्याने मागणी होत असल्याने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रीपेड ऑटो रिक्षा केंद्र स्थापन केले आहे. आतापर्यंत एक हजार २४९ रिक्षाचालकांनी नोंदणी केली असून, १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तर, ३१ लाखांपेक्षा जास्त व्यवहार या सुविधेमार्फत झाले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले म्हणाले की, पुणे स्टेशनवरील प्रवासी सेवा संघाचा करार संपुष्टात आला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ही सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी अगोदरच ऑनलाईन शुल्क घेतले जात आहे. त्यामुळे तक्रारी, वादविवाद या घटनांना पूर्णतः आळा घालता येणे शक्य झाले आहे. तसेच बेकायदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूटमार रोखण्यात फायदा होत आहे.