शिरूर (पुणे) : मुलीला पतीने नांदविण्यास नकार दिल्याने सासरच्या मंडळींनी जावई व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तर, जावई व त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नी व तिच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे. याबाबत पती-पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब नाना माने (वय ३४) यांचा शीतल भाऊसाहेब माने (वय २८) यांच्याशी २०११ मध्ये विवाह झालेला आहे. रविवारी (दि. १५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्नी शीतल यांचे नातेवाईक त्यांना शीतल हीस व्यवस्थित का सांभाळत नाही, तिला घराबाहेर का काढले आहे, हे विचारण्यासाठी गेले होते. यावेळी पती भाऊसाहेब नाना माने, सासरे नाना आप्पा माने, सासू शोभा आप्पा माने व दीर सचिन नाना माने (सर्व रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शीतल हिच्या नातेवाईकांना मारहाण केली.
तसेच पत्नीला व्यवस्थित का सांभाळत नाही, दुसरे लग्न केले आहे, असे म्हणत पत्नी शीतल हिचे नातेवाईक संदीप भागचंद कन्हे, वाल्मीक भागचंद कन्हे, सुभाबाई भागचंद कन्हे (तिघे रा. कन्हेवाडा रामलिंग ता. शिरुर जि.पुणे), जाई संतोष इंगळे, अनुसया नामदेव इंगळे (दोघे रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे) व शितल भाऊसाहेब माने (रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर) यांनी पती भाऊसाहेब माने यांना व कुटुंबीयांना मारहाण केली.