सोलापूर : पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवत भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांना प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे मोहिते-पाटील यांना सूचित करण्यात आले आहे.
याबाबत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार मोहिते-पाटील यांच्या पक्षविरोधी कारवायांबाबत भाजपकडे तक्रार केली होती. यावरून ही नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नोटिशीला रणजितसिंह मोहिते-पाटील काय उत्तर देणार ? त्याबाबत भाजप कोणती भूमिका घेणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
आमदार मोहिते-पाटील यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये आठ मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माळशिरस येथील सभांना अनुपस्थिती, लोकसभा निवडणूक काळात मोहिते पाटील परिवाराने भाजपविरोधात काम केल्याचे निदर्शनास आले, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पाडण्यासंदर्भात केलेले वक्तव्य, भाजपच्या बूथप्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे यांसह इतर ठपके मोहिते-पाटील यांच्यावर ठेवले आहेत.