नागपूर : मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भुजबळांनी आक्रमक भूमिका घेत पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. ‘मी मंत्रीमंडळात असावं,’ असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता, पण तरीही मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, असे भुजबळ यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ जाहीरपणे राष्ट्रवादीतील अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या त्रिकुटावर तोफ डागत आहेत. हे तिन्ही नेतेच सर्व निर्णय घेतात. मला मंत्रिपद सोडा पण साधे निर्णयप्रक्रियेतही सहभागी करुन घेतले जात नाही, असे भुजबळ म्हटले.
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या गटात दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. छगन भुजबळ हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी अजित पवारांवर केलेली थेट टीका पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील, याबद्दल शंका निर्माण करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तुम्ही ऊठ म्हणाले की ऊठ, आणि बस म्हणाले की बस असे करायला मी त्यांच्या हातातील खेळणं आहे का, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी केला आहे. मात्र, त्याचवेळी छगन भुजबळ यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भाव व्यक्त केलेला दिसून आला आहे.