ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर पावसाने पुढील खेळ रोखल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 89 धावा केल्या होत्या आणि त्यांची एकूण आघाडी 274 धावांची होती. या संपूर्ण सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.
दरम्यान ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी केवळ 25 षटके टाकता आली. ऑस्ट्रेलियाने भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पावसापूर्वी भारतीय संघाने दुसऱ्या डावात बिनबाद 8 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल 4-4 धावा करून नाबाद परतले. तत्पूर्वी, भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज केवळ 89 धावांत बाद केले होते, त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने डाव घोषित केला. सकाळी भारतीय संघ पहिल्या डावात 260 धावांवर सर्वबाद झाला होता. येथे कांगारूंकडे पहिल्या डावात 185 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या.
तिसरा सामना अनिर्णित राहिल्याने 5 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली, तर दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकली. 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर चौथा सामना खेळवला जाणार आहे.
बुमराह-आकाश दीपने फॉलोऑनपासून वाचवले
भारतीय संघाने पहिल्या डावात 213 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप या जोडीने अखेरच्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करून फॉलोऑनपासून बचाव केला.