नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी ( दि.17 डिसेंबर) रोजी लोकसभेत ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी करत सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, तरीही भाजपाचे तब्बल 20 खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपाकडून 20 खासदारांना आता नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे खासदार होते गैरहजर…
भाजपने सोमवारीच आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप काढला होता. त्यानंतर भाजपचे अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामध्ये केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत. यावेळी गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नितीन गडकरी, शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी वाई राघवेंद्र, गिरीराज सिंह, ज्योतीरादित्य सिंधिया, विजय बघेल, उदयनराजे भोसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.
दरम्यान, हे 20 खासदार गैरहजर का राहिले? याचं कारण आता त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरच समोर येणार आहे. त्यामुळे या खासदारांवर पक्षाकडून काही कारवाई केली जाते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.