नागपूर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे. 19 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले आहे.
भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून उद्या सकाळी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती स्वतः राम शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधासभा निवडणुकीत राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघातून पराभव केला आहे.
” महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक ”
माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब,
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब ,
त्याचबरोबर देशाचे…— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) December 17, 2024
विधान परिषदेचे महत्व काय?
महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यांत द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटक राज्यांत एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.