छत्रपती संभाजीनगर : लग्नाला वर्ष झाले नव्हते तोच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या माहेरी जाऊन डोक्यात रॉडने घाव घालून निघृण हत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास बीड बायपास भागातील महूनगर येथे घडली. भारती विठ्ठल वाघ (२६) असे हत्या झालेल्या विवाहितेचे तर विठ्ठल उत्तम वाघ (२८, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत राधाकिसन आसाराम गरबडे (६०, रा. महूनगर, बजाज हॉस्पिटल समोर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी राधाकिसन गरबडे हे बजाज हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त असून त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. सर्वांचे लग्न झालेले आहे. त्यातील भारतीचे लग्न जानेवारी २०२४ मध्ये आरोपी विठ्ठल वाघ याच्याशी झाले होते. ही सोयरीक गरबडे यांच्या घराच्या समोरच राहणारे नातेवाईक खंडू गडवे यांच्यामार्फत झालेली होती. लग्नानंतर भारती पती विठ्ठल, सासू, सासरे व इतर सासरची मंडळी यांच्यासह बोधेगाव येथे राहिली.
लग्नाच्या एक महिन्यानंतर भारती आणि विठ्ठल हे दोघे कामानिमित्त शहरात आले. दोघेही बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागे राहू लागले. तेथे विठ्ठल हा भारतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागला. दरम्यान, दिवाळी झाल्यावर दोघेही पुन्हा बोधेगावला राहायला गेले. मात्र तिथेही विठ्ठल भारतीला त्रास देतच होता. भारतीने वडिलांना फोनवर त्रासाबाबत सांगितले. त्यामुळे ८ डिसेंबरला गरबडे हे बोधेगावला गेले आणि भारतीला माहेरी घेऊन आले होते. तेव्हापासून भारती माहेरीच होती.
सोमवारी सकाळी भारतीची आई रंजना, भाऊ राहुल आणि वाहिनी हे कामानिमित्त घराबाहेर पडले होते. तर साडेअकराच्या सुमारास तिचे वडील राधाकिसन गरबडे हे पैसे काढण्यासाठी एमआयटी कॉलेजजवळील बँकेत गेले होते. त्यामुळे घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगी या दोघीच होत्या. भारतीच्या घरी कोणीच नसल्याचे पाहून विठ्ठल दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास भारतीच्या घरात शिरला होता.
आरोपी विठ्ठल हा रविवारी (दि. १५) रात्री दुचाकीने भारतीच्या घरासमोर असलेल्या नातेवाईक गडवे यांच्या घरी आला होता. दरम्यान, सोमवारी त्याने भारतीसोबत वाद घालून चक्राकार दात्र्याच्या लोखंडी रॉडने तिच्या डोक्यात अनेक घाव घातले. पाठीतही घाव घातल्याने भारती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर विठ्ठलने तेथून पळ काढला. तात्काळ भारतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून भारतीला मृत घोषित केले.