लोणी काळभोर : अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे. असे असतानादेखील प्रयागधाम (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा वृक्षतोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला आठ दिवस उलटून देखील वनविभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वृक्षांच्या जिवावर कोण उठलंय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
प्रयागधाम ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 72 मध्ये बेकायदा वृक्षतोड करण्यात आली आहे. ही वृक्षतोड ट्रक्टर, जेसीबीसह प्रयागधाम ट्रस्टच्या 4 ते 5 कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. सर्व नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे अधिकार आहेत. मात्र, वृक्षतोड करायची असेल तर वनविभागाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. वनविभागाची परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास त्यांच्यावर अनधिकृत वृक्षतोड केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 (दिनांक 1 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित) च्या कलम 21 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते.
प्रयागधाम येथील वृक्षतोड केल्याची माहिती वनविभागाला मिळालेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. त्यामुळे वनविभाग या प्रकरणात काय भूमिका घेणार? व वृक्षतोड करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर अनधिकृत पद्धतीने वृक्षतोड करणारे कोण आहेत? वृक्षतोड कशासाठी करण्यात आली ? याबाबत आता नागरिकांकडून विचारणा होऊ लागली आहे. तर या घटनेमुळे वृक्षप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम 1964 मध्ये सुधारणा करणारी तरतूद लागू झाली आहे. त्यानुसार पूर्वी ग्रामीण भागात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्यास कमाल 1 हजार रुपये दंड करण्याची तरतूद होती. त्यामध्ये गेल्या 60 वर्षात कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती. मात्र, पर्यावरण रक्षण करण्यासाठी व बेकायदा वृक्षतोडीला जात बसवणे गरजेचे होते. त्यामुळे दंडाची रक्कम आता 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
झाडे लावल्यानंतर मोठे होण्यासाठी खूप वर्ष लागतात. पण प्रयागधाम येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर झाडांची कत्तल होत असेल, तर निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आणि ती भरून न निघण्यासारखी आहे. झाडे नागरिकांना मोफत ऑक्सिजन देण्याचे काम करतात. मात्र, वृक्षतोड केल्यास ऑक्सिजन कुठून मिळणार? त्यामुळे अनधिकृत झाडे तोडणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई व्हायला हवी.
नितीन कोलते (निसर्ग प्रेमी, लोणी काळभोर, ता. हवेली)