दौंड : पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला कुसेगाव (ता. दौंड) येथील श्री भानोबा देवाचा दोन दिवसीय यात्रा उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. यात्रेत देवाचे दर्शन, तसेच देव-दानव युद्धाचा अद्भुत क्षण पाहण्यासाठी पुणे, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून ही हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दाखविली. या देव-दानव युद्धात पहिल्या दिवशी एकूण १ हजार २०२ गजे पडले.
कुसेगाव येथील श्री भानोबा देवाचा यात्रा उत्सव देव दानव युद्धाच्या खेळामुळे प्रसिद्ध आहे. येथील यात्रेतील देव-दानव युद्धाचा अद्भुत क्षण पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक गर्दी करतात. सोमवार (दि.१६) व मंगळवार (दि. १७) या दोन दिवशी यात्रा उत्सव पार पडला. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी कोयाळीकर गजांचे ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
दुपारी दोन वाजल्यानंतर मंदिरासमोरील मैदानात देव-दानव युद्धाचा खेळ रंगला. या वेळी १ हजार २०२ गजे पडले. युद्धाचा हा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी प्रांगणात प्रचंड गर्दी केली होती. तर, अनेकांनी कुतुहलतेने डोळ्यात व मोबाईलमध्ये हे दृश्य साठवून ठेवण्याची संधी साधली. रात्री मनोरंजनासाठी तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी नियोजित धार्मिक विधीनंतर मंदिरासमोर देव-दानव युद्ध रंगले. या वेळी १ हजार ३७५ गजे पडले.
यात्रेत तब्बल दोन टनापेक्षा जास्त मांसाहाराचा फडशा
यात्रेनिमित्त खेळणी, मिठाई आदी दुकाने, पाळणे आदींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली. यात्रेनिमित्त पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची पर्वणी असते. अंदाजे तब्बल दोन टनापेक्षा जास्त मटणाचा फडशा पडला असल्याचा अंदाज आहे. यात्रा काळात एकूण लाखोंची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात्रेनिमित्त हजारो भाविकांची गर्दी होते. यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र रस्त्यावरील वाहनांची लांबच्या लांब रांगानी यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे पाहायला मिळाले.