पुणे : म्हाडाच्या पुणे विभागाकडील घरांच्या सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान, म्हाडा ६ हजार २९४ घरांसाठी आतापर्यंत सुमारे ६८ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास १० ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झाली. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात आली होती. ती मान्य करीत म्हाडाने या सोडतीस १० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, नागरिकांकडून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ती मान्य करत म्हाडाने येत्या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज भरण्याची नागरिकांना संधी दिली आहे.
म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यामधील २ हजार ३४० घरे आहेत. म्हाडाच्या विविध योजनेतील घरांची संख्या ९३ आहे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची संख्या ४१८, तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांची संख्या ही ३ हजार ३१२ आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या १३१ आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळास भेट द्या
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती साकोरे यांनी दिली.