दौंड: राहू (ता. दौंड) परिसरात गेला महिनाभर पाळीव प्राण्यांवर हल्ला करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट मादीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. सोमवारी (दि. १६) वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात ही तीन वर्षे वयोगटातील बिबट मादी जेरबंद झाली आहे. राहू परिसरात ऊस क्षेत्र जास्त असल्या कारणाने या परिसरात बिबट्यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांचा या बिबट्याने फडशा पाडलेला आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी वर्ग व शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली जीव मुठीत धरून काम करत होता.
काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्याचे तीन लहान बछडे सापडले होते. त्यामुळे या भागात बिबट्या असण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने खेडेकर मळा येथे वनविभागाने दोन दिवसापूर्वी पिंजरा लावला होता. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून, शेतकरी व शेतमजुरांनीदेखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दौंड तालुका वनाधिकरी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी अंकुश थोरात, वनरक्षक गणेश म्हस्के, सुरेश पवार, भानुदास कोळपे, दत्तात्रय खोमणे, तेजस ठाकर, गणेश चौधरी आदींनी बिबट्या जेरबंद करण्यास परिश्रम घेतले.